Thursday, February 6, 2025

पंचनामे करून नुकसान भरपाई तात्काळ अदा करावी ; किसान सभा व एस.एफ.आय. ची मागणी


आंबेगाव (दि.२४) :  मागील ३-४ दिवसांपासुन आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात अतिवृष्टीमुळे  शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने लावलेली विविध पिके व शेतीचे बांध फुटुन वाहुन गेले आहेत, अनेक गावांतील  लोकांच्या घरात पाणी शिरून घरातील धान्य व वस्तुंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभा व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एस.एफ.आय.) यांच्या वतीने तहसीलदार रमा जोशी यांना खालील मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. हे निवेदन तहसील कार्यलयाच्या वतीने नायब तहसीलदार श्री.गवारी यांनी स्वीकारले.

संघटनेने केलेल्या प्रमुख मागण्या : 

•अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर, घरी जाऊन निपक्षपातीपणे पंचनामे त्वरित व्हावेत.

• शेतकऱ्यांच्या शेतीच्या,शेतपिकांच्या, घरांच्या व घरातील वस्तूंच्या झालेच्या नुकसानीची भरपाईची रक्कम, तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी.

 

•आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील अनेक ठिकाणचे रस्ते खचले आहेत व रस्त्यांवर दरडी कोसळल्या आहेत त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. व संपर्क तुटलेला आहे,सदर रस्त्यांची त्वरित डागडुजी करण्यात यावी. व पाऊस कमी झाल्यावर या रस्त्यांची पक्की कामे व्हावीत.

•विशेषतः नव्यानेच यावर्षी जे रस्ते तयार केले होते, ते रस्ते या पहिल्याच पावसात खचले आहेत, त्यामुळे सदरील रस्त्याच्या  कामाच्या गुणवत्तेवर ही प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत,अशा रस्त्यांच्या कामांची चौकशी व्हावी व दोषींवर कडक कारवाई व्हावी.

•आदिवासी भागात प्रचंड पडणारा पाऊस, लक्षात घेऊन रस्त्यांची बांधकामे ही विशिष्ट तंत्रज्ञान पद्धतीचा, अवलंब करून करता येऊ शकतात, त्यामुळे पारंपरिक पद्धतीने रस्ते तयार न करता पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन अशा पावसात ही रस्ते खचनार नाहीत असे रस्ते बांधले जावे.

•आंबेगाव तालुक्यात मागील निसर्ग चक्रीवादळात ज्यांच्या घरांचे नुकसान झाले त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही, ते अजूनही तहसील कार्यलयात हेलपाटे मारत आहे व अजूनही त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नाही.

•निसर्ग चक्रीवादळात हिरडा नुकसान भरपाईचे पंचनामे झाले पण नुकसान भरपाई अजून मिळाली नाही, त्यामुळे सद्यस्थितीत पंचनामे करत असतानाच, मागील नुकसान भरपाई ची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित मिळावी.

• प्रशासकीय यंत्रणेद्वारे आदिवासी भागातील विविध गावांचे अतिवृष्टीमुळे धोकादायक झालेले रस्ते, विजेचे पोल व इतर ठिकाणांचे निरीक्षण करून संभाव्य धोक्याची ठिकाणे निश्चित करून त्याठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात.

•आंबेगाव तालुक्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, तालुक्याच्या पश्चिम भागात, नैसर्गिक आपत्तीचा धोका नेहमी उद्भवत असतो, त्यामुळे तालुकास्तरावर तहसीलदार यांनी विविध विभागांतील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व तालुक्यातील विविध संस्था-संघटना यांचे प्रतिनिधी यांच्यासोबत एकत्रित बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने पूर्वनियोजन करावे.

• यापुढील तरी काळात तहसीलदार यांनी पुढाकार घेऊन आपत्ती व्यवस्थापनाचे पुर्वनियोजन व त्यासंबंधी उपाययोजना कराव्यात.

•आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील आज ही काही गावे डांबरी रस्त्याने एकमेकांशी जोडली नाहीत, तेथे मातीचे रस्ते आहेत,अशा आपत्तीच्या काळात या गावात काही अघटित घडले तर सरकारी यंत्रणा रस्ताच नसल्याने तेथे पोहचू शकत नाही,त्यामुळे तालुक्याच्या आदिवासी भागातील जी गावे अद्याप ही डांबरी रस्त्याने जोडली नाहीत, तेथे पूढील काळात पक्की  डांबरी सडक निर्माण करावी.   

वरील मागण्या त्वरित सोडवाव्यात ही विनंती अखिल भारतीय किसान सभा व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एस.एफ.आय.) च्या वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी किसान सभेचे तालुका सचिव अशोक पेकारी, उपाध्यक्ष राजु घोडे,पुंडलिक असवले,एस.एफ.आय.चे  समिर गारे, अविनाश गवारी याचबरोबर काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अशोक काळे पाटील इ.उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles