जुन्नर : मांगणेवाडी येथील खचलेल्या भागाची लोकप्रतिनिधींनी प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत पहाणी केली.
तालुक्यातील खामगाव गावातील मांगणेवाडी ठाकरवस्तीला आमदार अतुल बेनके यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत भेट घेतली. यावेळी भेग पडलेल्या व खचलेल्या भागाची पहाणी केली.
डोंगरउतारावर असलेली मांगणेवाडी – ठाकरवस्ती येथे ८० कुटुंबांची वस्ती आहे. गेल्या दोन वर्षांपासून अति पावसाने येथील जमिनीला मोठी भेग गेल्याने स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित पार्श्वभूमीवर अनेकदा अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली. परंतु पुढे कुठली कार्यवाही झाली नसल्याने ह्या गावचे उपसरपंच अजिंक्य घोलप यांनी आ. बेनके यांच्यासमोर समस्येचा पढा वाचला.
आ. बेनके यांनी दखल घेत आज तहसीलदार हनमंत कोळेकर, गटविकास अधिकारी चंद्रशेखर माळी, मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांना घेऊन पाहणी केली. आ. बेनके यांनी धोका ओळखून त्वरित वस्तीचे पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या.जिओलॉजिकल सर्व्हे व्हावा, अशी मागणी देखील बेनके यांनी केली.
संपूर्ण वाडीचे पुनर्वसन होण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर जी मदत लागेल ती करण्याचे आश्वासन तसेच भविष्यातील धोका ओळखून जिवीतहानी टाळण्यासाठी विशेष बाब म्हणून हे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी घोलप यांनी केली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे,माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊ देवाडे, संतोष ढोबळे, निलेश घोलप, ओंकार घोलप व स्थानिक नागरिक उपस्थित होते.