Wednesday, February 5, 2025

जुन्नर : रानभाजी महोत्सवास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद !

जुन्नर / आनंद कांबळे : जुन्नर येथे समाजप्रबोधिनी भवन येथे आयोजित रानभाजी महोत्सवास नागरीकांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी सुमारे २५० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला तसेच सुमारे ५५० ते ६०० नागरीकांनी या महोत्सवास भेट दिली.

सह्याद्रीतील दडलेला रानमेवा तसेच विविध भाज्या दैनंदिन जीवनात वापरल्यामुळे कोरोना सारख्या संसर्गाचे प्रमाण कमी होताना दिसून आले आहे व त्याचे औषधी गुणधर्मामुळे रानभाजीचे महत्व गडद होत आहे. त्यातूनच रानभाजी महोत्सवा सारख्या उपक्रमातून आदिवासी शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध होत आहे.

महोत्सवाचे अध्यक्षीय भाषणात आमदार अतुल बेनके यांनी सांगितले की, इंडीजिनीयस पीपल म्हणजेच निसर्ग जोपासणारा, निसर्गावर अवलंबून व त्याची काळजी घेणारा आदिवासी बांधव आहे. डोंगर, दऱ्यांमध्ये मिळणाऱ्या रानभाज्या यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.यासाठी स्टार्टअप सारखे उपक्रम राबविणे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ल्युपिन फाऊंडेशनच्या माध्यमातून मधुमाशी पालनासाठी किंबहुना रोजगार मिळणेकामी पेट्यांची मागणी केली असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सुमारे ५०० पेट्या उपलब्ध करून देणार आहे. त्याचप्रमाणे पर्यटनाच्या दृष्टीने तसेच द्राक्ष महोत्सव मोठ्या प्रमाणात राबविणेसाठी त्याची व्याप्ती वाढविणार आहोत. शिवनेरी हापूस आंबा याकरीता २५ लाख निधी जी. आय. मानांकन साठी उपलब्ध केलेला आहे. त्याचप्रमाणे चावंड, जळवंडी, अंजनावळे येथे बुडीत बंधारे साठी प्रयत्न करीत असून शबरी महामंडळाकडून हिरडा विकास कारखान्यासंदर्भात चर्चा झाली असून तांत्रिक बाबीचे निवारण झालेनंतर पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.

सदर महोत्सवास मार्गदर्शन करताना प्रकल्प संचालक (आत्मा,पुणे) चे राजेंद्र साबळे यांनी रानभाजी वर्षभर मिळावी यासाठी ही भविष्यासाठी सुरूवात असून याकरीता संशोधक, शेतकरी यांनी गट स्थापन करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी विविध योजनांची व कृषी अभियानांची शेतकऱ्यांना माहिती दिली.

रानभाजीचे महत्व सांगताना मानवाचे आहारातील घटकात, संतुलित आहारामध्ये ३०० ग्रॅम फळभाज्यांची आवश्‍यकता असते. तसेच मांसाहार करण्याचे प्रमाण वाढल्याने बद्धकोष्ठता सारखे विकार वाढू लागले आहे. आहारात तंतुमय पदार्थांचे सेवन केल्यास पचनसंस्था व्यवस्थित राहते व निरोगी आरोग्य लाभते. रानभाज्यांचे विविध प्रकार व त्याचे असलेले औषधी गुणधर्म यांमुळे बऱ्याच विकारांवर त्याचा प्रभाव पडतो. तसेच रानभाज्यांचे महत्व व त्याचे उपयोगाकरीता एनजीओंच्या माध्यमातून उपक्रम राबविले जावे अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव चे शास्त्रज्ञ भरत टेमकर यांनी दिली.

पर्यटन प्रशिक्षक मनोज हाडवळे यांनी रानभाज्यांचे व्यंजन व त्यांचा अंतर्भाव केला पाहीजे जेणेकरुन पर्यटकांना याचा फायदा होईल तसेच पश्चिम घाट पट्ट्यांची व्यापकता पहाता कृषी पर्यटनातून याची व्याप्ती वाढणार आहे मात्र यासाठी लोकसहभागातून पर्यटन विकास या उक्ती प्रमाणे स्थानिकांनी पुढाकार घेणे महत्वाचे राहणार असल्याचे सांगितले.

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव भरविण्यात येतो. विकेल ते पिकेल याकरीता शासनाचे मार्फत लागवडीसाठी देखील प्रयत्न केला जाईल असे उपविभागीय कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी सांगितले.

रानभाजी महोत्सवास उपलब्ध असलेल्या भाज्यांची पाककृतीची माहिती श्रीमती डोळस यांनी दिली.

आत्मा पुणे चे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे, प्रकल्प उपसंचालक श्रीमती पुनम खटावकर, उपविभागीय कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, पंचायत समिती सदस्य काळू गागरे, हिरडा प्रकल्पाचे अध्यक्ष काळू शेळकंदे, नगरसेवक भाऊ कुंभार, फिरोज पठाण, सुनिल ढोबळे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, पोलीस निरिक्षक विकास जाधव, अरुण पारखे, गणपत कवडे, संतोष केदारी, समाजप्रबोधनी अध्यक्ष रविंद्र तळपे, रविंद्र काजळे इ. मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी जुन्नर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बापुसाहेब रोकडे व आभार प्रदर्शन मंडल कृषि अधिकारी प्रमोद बनकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषि विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles