स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्यातील तरुणाई, समाजातील सर्वच नागरिकांना स्फूर्तीदायक असणारे आणि महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे अस्मितादर्शक ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे कवी राजा नीळकंठ बढे लिखित स्फूर्तीगीत राज्य शासनाने राज्याचे अधिकृत राज्यगीत म्हणून स्वीकारले असूनन याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.
या राज्यगीत गायनाबाबतची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
कवीवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतावर यथोचित संस्करण करून दोन चरणांसह राज्यगीत स्वीकृत करण्यात आले आहे. या गीताचा कालावधी सुमारे 1.41 मिनिटे असणार आहे. सर्व नागरिकांनी राज्यगीताच्या सन्मानपूर्वक गायन वादनामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.
संपूर्ण गीत हे अत्यंत आशयपूर्ण, स्फूर्तीदायक आणि राज्याच्या थोर आणि शूर परंपराची गाथा सांगणारे असले तरी राज्यगीत हे विविध प्रसंगी सातत्याने सादर होणे अपेक्षित आहे. त्यामुळे वेळ मर्यादेचे भान ठेऊन त्याचे संक्षिप्तीकरण होणे आवश्यक होते.