जुन्नर : आदिवासी साहित्यासाठीचा डॉ.गोविंद गारे पुरस्कार पुन्हा सुरू करा, अशी मागणी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचच्या वतीने नायब तहसीलदार शांताराम किरवे यांच्यामार्फत मुख्यमंत्री, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, आदिवासी विकास मंत्री यांच्याकडे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, मराठी भाषा विभागाच्या 23 ऑगस्ट 2017 च्या शासन निर्णयानुसार स्व. यशवंतराव चव्हाण, राज्य वाङमय पुरस्कार योजनेअंतर्गत उत्कृष्ट आदिवासी साहित्याला डॉ. गोविंद गारे यांच्या नावाने साहित्य पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले. परंतु 7 डिसेंबर 2019 च्या भाषा विभागाच्या शासन निर्णयाने हा पुरस्कार देण्याचे थांबविण्यात आले आहे. व आदिवासी साहित्याचा समावेश उपेक्षितांचे साहित्यात केला आहे. मूलतः आदिवासी साहित्याचे स्वतंत्र अस्तित्व मान्य न करता त्याचा समावेश इतरत्र करणे हा आदिवासी साहित्यावर आणि समाजावर अन्याय आहे.
महाराष्ट्रात आदिवासींच्या ४५ जमाती व ७४ बोली भाषांची वेगळी ओळख असताना हा पुरस्कार रद्द करून त्याचा समावेश इतर घटकात केल्याने आदिवासी साहित्याची स्वतंत्र ओळख संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झालेला आहे. वास्तविक पाहता आदिवासी साहित्यिकांना लेखनासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी आदिवासी साहित्याचा पुरस्कार डॉ. गोविंद गारे यांच्या नावाने पुन्हा सुरू करण्यात यावा अशी मागणी मागणी करण्यात आली.
निवेदन देतेवेळी आदिवासी अधिकार मंचाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य संजय साबळे, गणपत घोडे, नवनाथ गवारी, नवनाथ मोरे, राजू शेळके, आशिष शेळकंदे उपस्थित होते.