भर पावसात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भरमसाठ वाढलेल्या शुल्कासह अन्य मागण्यांसंदर्भात विद्यार्थी सलग ३ दिवसांपासून मुख्य इमारत इमारत आवारात भर पावसात बेमुदत घंटानाद आंदोलन करत होते. अखेर प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत विद्यार्थ्यांना सर्व मागण्यांचे लेखी आश्वासन देऊन आंदोलन थांबवले.
आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड चंद्रशेखर आजाद यांनी प्र-कुलगुरू, कुलसचिव यांच्यासोबत आंदोलनस्थळी कालप्रमाणे आजही भेट दिली. विद्यापीठ प्रशासनाने लेखी दिलेले आश्वासन लवकर पूर्ण करावे, असे त्यांनी आंदोलकांच्या वतीने प्रशासनास कळविले.
विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने गेल्या ३ दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनाला काल (दि. १३) अखेर विद्यापीठ प्रशासनातर्फे प्र-कुलगुरू संजीव सोनवणे आणि कुलसचिव प्रफुल पवार यांनी भेट देऊन समितीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शुल्कवाढीसंदर्भात समितीशी चर्चा करून लवकरच शुल्कवाढ मागे घेऊ, असे लेखी अश्वासनात कळवले. तसेच अनिकेत कँटीन, झेरॉक्स सेंटर आणि इंटरनेट कॅफेचेही टेंडर काढत असून येत्या १० दिवसात तेही सुरू करू, असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे विद्यापीठातील विद्यार्थीहिताच्या प्रत्येक मुद्द्यावर विद्यापीठ प्रशासन सातत्याने विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीसोबत प्रत्येक महिन्यात सातत्याने चर्चा करेल आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवर आवर्जून काम करेल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
गेल्या ३ दिवसांपासून रात्रं-दिवस भर पावसात अन्न-पाण्याकडे दुर्लक्ष करत आमचे साथी शुल्कवाढ रद्द करण्याचा लढ्यात संघर्ष करत होते. अखेर विद्यापीठ प्रशासनाला जाग येऊन बुधवारी आमच्या समितीशी संवाद साधून संवेदनशीलता दाखवत आम्हा विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेऊन आम्हाला लेखी आश्वासन दिले, त्याबद्दल प्रशासनाचे धन्यवाद. तसेच हे आश्वासन लवकरच पूर्ण होईल असा आम्ही आशावाद बाळगतो.
– तुषार पाटील निंभोरेकर, (सदस्य, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती)
ज्या मागण्यांसाठी आंदोलक विद्यार्थी भर पावसात सलग ३ दिवस संघर्ष करत होते त्या संघर्षाला अखेर प्राप्त झाले. याचे संपूर्ण श्रेय हे विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीला जाते.
– पौर्णिमा गायकवाड, संशोधक विद्यार्थिनी
कृती समितीच्या वतीने एसपीपीयू टीचर्स असोसिएशन, पोलीस, विद्यापीठ प्रशासन, सर्व सहभागी विद्यार्थी, राजकीय संघटना आदींचे आभार मानत राष्ट्रगीताने आंदोलनाचा समारोप झाला.