डहाणू : डहाणू व तलासरी सहित पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरिया व इतर आवश्यक खते तात्काळ उपलब्ध करून द्या अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू आमदार कॉ. विनोद निकोले यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पालघर यांच्या कडे ई-मेल द्वारे पत्र पाठवून केली आहे.
यावेळी आ. निकोले म्हणाले की, १२८ डहाणू विधानसभा मतदार संघात डहाणू व तलासरी ही दोन तालुके येतात. पालघर जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहेत त्यामध्ये जव्हार, मोखाडा, वाडा, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यांचा समावेश आहे. पालघर जिल्हाचे एकूण भौगोलिक क्षेत्र ४६९६९९ हेक्टर असून त्यामध्ये एकूण १००७ गावे व ३८१८ पाडे आहेत. तसेच ४६७ ग्रामपंचायती आहेत.
डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चिकू व नारळ तसेच इतर फळबागामध्ये लिची, आंबे, फणस, केळी इत्यादी यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. समुद्रकिनारी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची लागवड केली जाते, त्यामध्ये मिरची, वॅनीला, टोमॅटो यांचे लागवड क्षेत्र जास्त असून दररोज मुंबईच्या बाजारपेठेला पुरवठा केला जातो. तालुक्यातींल साखरे, कवडासा व सुर्या प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी तसेच शेती साठी देखील वापरले जाते. तलासरी तालुक्यातील मुख्य व्यवसाय शेती आहे. प्रामुख्याने भात हे मुख्य पीक असुन हे पीक पावसावर अवलंबुन आहे. ज्याअर्थी गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे शेताच्या कामांना सुरवात झाली आहे.
पालघर जिल्ह्यात सध्या भात लावणी ची कामे जोरदार सुरु असून त्याकरिता युरिया खताची शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु, गेल्या अनेक दिवसापासून युरिया खताचा तुटवडा जिल्ह्यात विशेषतः डहाणू तालुक्यात भासत आहे. युरिया खत काही प्रमाणात काही कृषीसेवा केंद्राकडे उपलब्ध होताच एक ते दोन दिवसांमध्ये संपून जात आहे. त्यामुळे दूर अंतरावरून व दुर्गम भागातून खताच्या अपेक्षेने येणाऱ्या गरीब शेतकऱ्यांचे युरिया खत न मिळाल्याने अतोनात हाल होत असून त्यास आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. त्याअनुषंगाने पालघर जिल्ह्यातील विशेषतः डहाणू व तलासरी तालुक्यातील शेतकऱ्यांना भात लावणी करिता व इतर पिकांसाठी युरिया व इतर आवश्यक खते तात्काळ उपलब्ध करून द्यावे असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू आमदार कॉ. विनोद निकोले यांनी सांगितले आहे.
याप्रसंगी माकप आमदार कॉ. विनोद निकोले, डहाणू तालुका किसान सभा अध्यक्ष चंद्रकांत घोरखाना, तलासरी तालुका अध्यक्ष रामू पागी, लहानी दौडा, सुनीता शिंगडा, लता घोरखाना आदी किसान सभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.