Thursday, November 21, 2024
Homeआंतरराष्ट्रीयविशेष लेख :आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास आणि भविष्य!

विशेष लेख :आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास आणि भविष्य!

८ मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजे महिलांच्या हक्कांसाठी उभ्या केलेल्या संघर्षाचे स्मरण करून सर्व महिलांच्या हक्क आणि अधिकारांसाठी लढण्याचा निर्धार करण्याचा दिवस. घरात, समाजात, अर्थव्यवस्थेत, राजकारणात, शासनात स्त्री-पुरुष समतेची मागणी करण्याचा दिवस. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रात काम कारणार्‍या महिलांनी आपल्या होणार्‍या शोषणाविरुध्द व अन्यायाविरुद्ध संघटितपणे पहिल्यांदा आवाज उठविला. हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मुख्य मागण्या होत्या. त्यावेळी युरोप–अमेरिकेसह अनेक देशांमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता त्यामुळे ह्या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली.

ह्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर झुंझार समाजवादी कार्यकर्त्या क्लारा झेटकीन ह्यांनी १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च हा ‘जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा ठराव मांडला आणि तो पारित झाला. तेव्हापासून जगभरातील महिला दर वर्षी ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करतात.नंतरच्या काळातही जगभरामध्ये निरनिराळ्या मागण्यांसाठी महिलांचे संघर्ष आणि लढे चालूच आहेत—कधी समतेची मागणी करत, तर कधी कामगार म्हणून होत असलेल्या शोषणाविरोधात. आज अनेक नवीन प्रश्न आणि आव्हाने आपल्यासमोर उभी राहिली आहेत. म्हणूनच आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्त्व समजून घेण्याची जास्त गरज आहे.

जागतिकीकरणाच्या गेल्या पंचवीस वर्षांच्या काळात सर्वच क्षेत्रात नोकऱ्यांची चणचण आहे. टाळेबंदी, कामगार कपात व कंत्राटीकरण ह्यामुळे कामगार वर्गाची परिस्थिती फारच गंभीर झाली आहे. आपल्या देशातले कामगार कायदे मोडीत काढले जात आहेत. ह्या धोरणांमुळे महिलांच्या रोजीरोटीचा प्रश्न तर फारच तीव्र होत आहे. ह्याचे परिणाम स्त्रियांना विशेषतः गरीब, कष्टकरी, असंघटित, दलित, आदिवासी आणि कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या स्त्रियांना भोगावे लागत आहेत.

 अनेक आव्हाने समोर असताना भांडवली व्यवस्थेने स्त्रियांच्या लढाऊ इतिहासाला आपल्या ताब्यात घेतले आहे. अनेक स्वयंसेवी संस्था आणि कॉर्पोरेट समूहांनी महिला दिनाला महिलांचे कोडकौतुक करण्याचा दिवस बनवले आहे. मीडियाही ह्या दिवसाची प्रचंड जाहिरातबाजी करत आहे. कुणी स्त्रियांना खरेदीवर विशेष सूट देतात, तर कुणी दागदागिन्यांवर. काही तर चक्क फॅशन शो, डान्स, म्युझिक, रांगोळी अशा स्पर्धा घेऊन त्याचा ‘ईव्हेंट’ करत आहेत. महिला दिन हा आज फक्त बायकोला किंवा मैत्रिणीला खूष करण्याचा दिवस बनून गेला आहे. महिला दिनाच्या ह्या बाजारू स्वरूपाला विरोध करत स्त्रियांच्या लढ्याला पुढे नेण्याची जबाबदारी आज आपल्या तरुण पिढीची आहे. महिलांवर होणाऱ्या सर्व प्रकारच्या हिंसा, विषमता आणि शोषणाच्या विरोधात एकत्र येण्याची आज गरज आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांवर आधारित नवीन समाज बनवण्याचे आव्हान आपल्याला पेलायचे आहे व ह्यासाठी आपण सगळ्यांनी एकजूट उभारून एक नवीन मजबूत स्त्री-चळवळ उभी करण्याची गरज आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय