Friday, February 7, 2025

PCMC : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महापालिकेने सुरू केलेले उपक्रम लोकाभिमुख प्रशासनासाठी महत्वपुर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पिंपरी चिंचवड ( क्रांतीकुमार कडुलकर) दि. ६ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून माहितीचे संकलन करणारा सिटी हब उपक्रम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या होर्डिंग शोध आणि सर्वेक्षण प्रणाली सारखे उपक्रम नागरी हितासाठी उपयुक्त आहेत. पिंपरी चिंचवड शहराला आधुनिक शहर बनविण्यासाठी नागरी सुरक्षेच्या दृष्टीने राबविलेले लोककल्याणकारी प्रकल्प महत्वपुर्ण ठरतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (PCMC)

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्प आणि उपक्रमांचा भूमीपूजन, लोकार्पण समारंभ तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचा भूमीपूजन सोहळा जाधववाडी चिखली येथील एमएनजीएल पंपासमोर आयोजित करण्यात आला होता.

यावेळी महापालिकेच्या सुमारे ४८३.४७ कोटी रुपयांच्या उपक्रमांचे आणि प्रकल्पांचे भूमीपूजन, लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार अमित गोरखे, विजय शिवतारे, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, शरद सोनवणे, शंकर जगताप, ज्ञानेश्वर कटके, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, माजी खासदार अमर साबळे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, पोलीस व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शहरात घडणाऱ्या आगीच्या घटनांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कॅलिफोर्नियामध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविताना अमेरिकेसारख्या विकसित देशाला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली. पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नगर आहे , अशा शहरात महानगरपालिकेने सुरक्षिततेच्या दृष्टीने मध्यवर्ती अग्निशमन केंद्र व अग्निशमन प्रबोधिनी उभारण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला असून ही बाब कौतुकास्पद आहे. तसेच महापालिकेच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत अधिक प्रभावी पद्धतीने पुरवून नागरिक केंद्रित प्रशासन आणि प्रशासनामध्ये लोकाभिमुखता, पारदर्शकतेसह उत्तरदायी प्रशासन निर्माण करण्यास सिटी हब फॉर डेका कम्युनिकेशन (CHDC) उपक्रम महत्वपुर्ण ठरणार आहे.

विविध शहरांमध्ये अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उपाय म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून सुरू केलेला होर्डिंग्स शोध आणि सर्वेक्षण प्रणाली महत्वपुर्ण ठरेल. यामुळे केवळ अधिकृत होर्डिंग्सवर जाहिराती लागल्या जातील आणि शहराचे विदृपीकरण होणार नाही. (PCMC)

PCMC

देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राचे महत्वाचे योगदान आहे. तसेच महाराष्ट्राच्या विकासामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड ही शहरे ग्रोथ इंजिन म्हणून काम करतात. या ठिकाणी उद्योगधंद्यांना पोषक वातावरण राहील याची दक्षता घेणे सर्वांची जबाबदारी आहे. या शहरांच्या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यासाठी मोठमोठ्या कंपन्यांना आणले जाईल. ज्यामुळे रोजगार उपलब्ध होऊन शहराचा झपाट्याने विकास करण्यावर भर दिला जाईल. तसेच पिंपरी चिंचवड शहराला आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून दिली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. २०५४ पर्यंत पुणे शहरापेक्षा पिंपरी चिंचवडची लोकसंख्या अधिक होणार आहे. त्याअनुषंगाने आगामी ५० वर्षे डोळ्यासमोर ठेऊन शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय इमारतींची उभारणी करण्यावर भर दिला जात आहे. या प्रशासकीय इमारतींमध्ये जेव्हा नागरिक येतील तेव्हा त्यांना समाधान वाटावे आणि अधिकारी, कर्मचारी यांना त्याठिकाणी काम करताना उत्साह वाटायला हवा याची दक्षता घ्यावी असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. (PCMC)

शहरामध्ये बायोडायव्हर्सिटी पार्क, एसटीपी प्रकल्प, अग्निशमन केंद्रे, प्राथमिक माध्यमिक शाळा, कर्मशियल सिटी सेंटर यांसारखे प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासोबतच वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूकीवर भर देऊन त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. याशिवाय पुणे, पिंपरी चिंचवड शहरामध्ये नवीन रस्त्यांची आणि परिसरात रिंगरोडची उभारणी करण्यासाठी आवश्यक भासल्यास शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही ते म्हणाले. (PCMC)

यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी भूमीपूजन, लोकार्पण, उद्घाटन होणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.

पिंपरी येथील मध्यवर्ती अग्निशमन केंद्र व अग्निशमन प्रबोधिनी

औद्योगिक नगरी म्हणून उदयास आलेल्या पिंपरी चिंचवड शहरात अनेक छोटे मोठे औद्योगिक कारखाने आहेत. शिवाय शहराची लोकसंख्या मागील काही वर्षात झपाट्याने वाढलेली आहे. त्याअनुषंगाने उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे शहराची सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करणे गरजेचे आहे. आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीला तत्परतेने प्रतिसाद देण्यासाठी एक महत्वपुर्ण संसाधन महापालिकेकडे कार्यरत राहण्याकरिता सुसज्ज आणि सामरिकदृष्ट्या स्थित अग्निशमन केंद्रांची स्थापना करणे आवश्यक आहे.
(PCMC)
त्याअनुषंगाने पिंपरी येथील सुविधा भुखंडावर मध्यवर्ती अग्निशमन केंद्र व अग्निशमन प्रबोधिनी इमारत उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी १५० कोटी ८६ लाख रुपये इतका खर्च होणार आहे. या अग्निशमन इमारतीमध्ये २२ अग्निशमन वाहनांकरिता वाहनतळ, कार्यशाळा, बोट वाहनतळ, ट्रेनिंग रूम, युद्ध कक्ष, ऑपरेशनल स्टाफ एरिया रूम, रेकॉर्ड रूम, उपहारगृह, व्यायामशाळा, विश्रामगृह, स्वच्छतागृह, वाहनतळ, २०० आसनव्यवस्था असलेले प्रेक्षागृह, अग्निशमन कार्यालय, सभागृह, लँडस्केप कोर्ट, फायर संग्रहालय, मनोरंजन क्षेत्र, थिएटर आदी सुविधांनी सज्ज असलेली ८ मजली व्यावसायिक इमारत उभारली जाणार आहे. याशिवाय ११८ सदनिका व २ तळमजले आणि वाहनतळाचा समावेश असलेली १५ मजली रहिवाशी इमारत देखील उभारण्यात येणार आहे. अग्निसुरक्षा शिक्षण आणि प्रतिबंध कार्यक्रम आयोजित करण्यास या मध्यवर्ती अग्निशमन केंद्राची महत्वाची भूमिका असणार आहे. या प्रकल्पाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. (PCMC)

आकुर्डी येथील अग्निशमन केंद्र

सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करून आगीच्या घटनांमध्ये होणाऱ्या जिवीत व वित्त हानीला रोखण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीला तत्परतेने सामोरे जाण्यासाठी आणि जीव आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी पुरेशा अग्निसुरक्षा सेवेची उपलब्धता शहरता असणे आवश्यक आहे. यासाठी आकुर्डी येथे अग्निशमन केंद्राची उभारणी येणार आहे. १० मजल्याच्या या इमारतीमध्ये ६ अग्निशमन वाहनांसाठी वाहनतळाची सोय असणार आहे. या प्रकल्पासाठी ३० कोटी ६४ लाख रुपये इतका खर्च होणार आहे.

मधुबन हॉटेल ते इंदिरा रोड आणि सिल्वर स्पून हॉटेल ते इंदिरा रोड या रस्त्यांचा विकास

नागरिकांचा प्रवास आरामदायी व्हावा आणि वाहतूक कोंडी कमी होऊन दळणवळण सुरळीत व्हावी यासाठी मधुबन हॉटेल ते इंदिरा रोड या २४ मीटर डी.पी रस्त्याचे व सिल्वर स्पून हॉटेल ते इंदिरा रोड या १८ मीटर डी.पी रस्त्याचे तसेच या दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या वाकड शिवेपर्यंतचा १८ मीटर रुंदीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत मधुबन हॉटेल ते इंदिरा रोड या २४ मीटर या एकूण १४२० मीटर लांबीचे तसेच सिल्वर स्पून हॉटेल ते इंदिरा रोड या १८ मीटर रुंद अशा एकूण ११२० मीटर लांबीच्या रस्त्याचा विकास करण्यात येणार आहे. सुरक्षित पदपथ, सुनियोजित पार्किंग, पावसाळी पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. शिवाय रस्ता दुभाजक, सायकल ट्रॅक तयार केले जाणार आहे. या कामासाठी र.रु. ५८ कोटी ४५ लाख इतका खर्च होणार आहे.(PCMC)

पवना नदीवरील मामुर्डी ते सांगवडे दरम्यान जोडणारा पूल

मामुर्डी ते सांगवडे दरम्यान पवना नदीवर ९० मीटर लांबीचा पुल पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे महानगर विकास प्राधिकरण यांच्या समान भागीदारी खर्चातून उभारण्यात येणार आहे. पुलाच्या एका बाजूस महापालिका हद्दीतील मामुर्डी, किवळे, रावेत, पुनावळे आदी भाग असून पुलाच्या दुसऱ्या बाजूस पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडील सांगवडे, हिंजवडी हा भाग आहे. या भागातील वाढती लोकसंख्या, शहरीकरण व औद्योगीकरणाचा विचार केला असता हा १५ मीटर रुंदीचा पुल व पुलाचे जोडरस्ते विकसित केले जाणार आहेत. त्यामुळे या भागातील स्थानिक नागरिक, व्यावसायिक, शेतकरी व विद्यार्थी यांची प्रवास व वाहतुकीची समस्या सुटणार आहे. शिवाय या पुलाच्या उभारणीनंतर भूमकर चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. या कामासाठी ३७ कोटी २५ लाख रुपये इतका खर्च होणार आहे. या प्रकल्पाचे भूमीपूजन आज संपन्न झाले.

ई-प्रशासन संगणक प्रणाली –

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडने भारत सरकारच्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत GIS Enabled ERP प्रकल्पाअंतर्गत ३३ संगणक प्रणाली विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणातील माहितीचे व्यवस्थापन (data management) करण्यास तसेच विविध प्रक्रिया स्वयंचलित होण्यास मदत मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या १००० पेक्षा अधिक प्रक्रियांवर Business Process Re Engineering करण्यात आली आहे. यामुळे महापालिका अधिकारी कर्मचा-यांना तसेच नागरिकांना अधिक दर्जेदार व जलद सेवा प्रदान करण्यात मदत होणार आहे. ई-ऑफिस या संकल्पनेचा कामकाजात समावेश करून कागदविरहत कार्यालयीन कामकाजाला प्रोत्साहन देणे, प्रशासकीय कामकाज सुलभ करणे आणि विभागांमध्ये योग्य समन्वय साधून कामकाजात अधिक सुसूत्रता आणणे हा यामागचा उद्देश आहे. शिवाय यामुळे ऑनलाईन दस्तावेज हाताळण्याच्या प्रक्रियेतील गती, अचूकता, पारदर्शकता आणि सुरक्षा देखील वाढणार आहे. याबाबत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. या उपक्रमासाठी ११२ कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. या संगणक प्रणालीचा शुभारंभ आज करण्यात आला.

चिंचवड येथील नवीन तालेरा रुग्णालय (PCMC)

महापालिकेच्या वतीने शहरातील वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आणि शहरातील नागरिकांना अल्प दरात दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चिंचवड येथे ६० कोटी ६० लाख रुपये खर्च करून नव्याने १५८ खाटांचे सुसज्ज मल्टीस्पेशालिटी तालेरा रुग्णालय उभारण्यात आले आहे. या ५ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ओपीडी, मेडिकल दुसऱ्या मजल्यावर ऑपरेशन थिएटर, NICU, लहान मुलांचा वॉर्ड असणार आहे. तर तिसऱ्या मजल्यावर ४ ऑपरेशन थिएटर, डायलिसीस, ICU या सुविधा असून चौथ्या मजल्यावर जनरल वॉर्ड व प्रयोगशाळेची सुविधा आणि पाचव्या मजल्यावर निवासी विभाग, प्रशासन विभाग, ENT व ऑर्थो वॉर्ड, कॉन्फरन्स रूम आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच ऑक्सिजन पुरवठा कक्ष, ४ उद्वाहक, सी.सी.टी.व्ही यंत्रणा, सुरक्षा व्यवस्था, आधुनिक अग्निशामक व्यवस्था, फार्मसी, जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन या सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. या रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले.

टाकाऊ वस्तूंपासून निर्मित केलेल्या टिकाऊ (Waste to Wonder) कलाकृती

निरुपयोगी, भंगार, नादुरुस्त साहित्यांचा वापर करून टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ (Waste to Wonder) कलाकृतींची निर्मिती महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत विविध उद्यानांमध्ये तसेच पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ येथे १५ लहान मोठ्या आकाराच्या डायनोसॉरच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. तसेच Evolution of Car’s अंतर्गत सन १८८६ ते सन २०१६ पर्यंतच्या काही प्रवासी चार चाकी वाहनात झालेले बदल ८ आकर्षक शिल्पाच्या माध्यमातून दर्शविण्यात आले आहेत. शहराच्या पर्यटनाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा ठरणार असून यासाठी ८ कोटी १ लाख रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. या कलाकृतींचे लोकार्पण आज करण्यात आले.

विविध प्रशासकीय इमारतींवर बसविण्यात आलेले सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प

शाश्वत उर्जेतून विजेची बचत करण्याच्या हेतूने महापालिकेच्या विविध शाळा, प्रशासकीय इमारती, नाट्यगृहे, रुग्णालय इमारतीवर पूर्वी ६३१ किलोवॅट क्षमतेचे सोलर रुफ टॉप प्रकल्प बसवून कार्यन्वित करण्यात आले आहेत. आता नव्याने ८ प्रभाग मिळून एकूण ८४ ठिकाणी ३०९७ किलोवॅट क्षमतेचे प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत. यामुळे प्रती वर्ष महावितरण कंपनीच्या प्रचलित युनिट दरानुसार महापालिकेची सुमारे ४.८३ कोटी इतकी बचत होणार आहे. आतापर्यंत निगडी प्राधिकरण येथील अ क्षेत्रीय कार्यालय, चिंचवड येथील तारांगण, प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, मोहननगर येथील जिजाऊ सांस्कृतिक भवन, संभाजीनगर येथील शाहु महाराज जलतरण तलाव, वाय.सी.एम रुग्णालय, महापालिका मुख्य प्रशासकीय भवन, जलशुद्धीकरण केंद्र, मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हेडगेवार भवन येथे देखील सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम पुर्ण झाले आहे. येत्या काही दिवसांत महापालिकेच्या विविध प्रशासकीय इमारतींवरही सौरउर्जा प्रणाली बसविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ५ कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन आज संपन्न झाले.

सिटी हब फॉर डेटा कम्युनिकेशन (CHDC) –

मनपाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत अधिक प्रभावी पद्धतीने पुरविण्यासाठी महापालिकेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. या सेवा प्रदान करत असताना नागरिकांचे प्रोफाईल तयार करणे, डेटा मिळविणे या अनुषंगाने शहरातील नागरिकांचा परिपुर्ण डेटा संकलित करून त्यानुसार महापालिकेची ध्येय धोरणे ठरवून त्याची अंमलबजावणी अधिक सक्षमपणे करणे गरजेचे आहे. त्यासाठी सिटी हब फॉर डेटा कम्युनिकेशन (CHDC) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट महापालिकेच्या विविध विभागांमध्ये डेटा-चलित निर्णयक्षमता वाढविणे, विविध विभागामार्फत देण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेवा आणि त्यातून प्राप्त होणाऱ्या माहितींचे एकत्रीकरण करून त्या दृष्टीने आवश्यक कार्यप्रणाली तयार करणे हे आहे. महापालिकेच्या उत्पन्न वाढीसोबतच नागरिकांच्या विविध तक्रारींचे निराकरण सुयोग्य पद्धतीने करता यावे यासाठी ही प्रणाली महत्वाची ठरणार आहे. शिवाय या प्रणालीमुळे विविध विभागाकडील माहितींचा अंतरसमन्वय करणे यामुळे सोपे होणार असून प्राप्त माहितीचे विश्लेषण करून त्यातून विविध धोरणे आखणे, संवाद माध्यमे कार्यान्वित करणे, विविध निर्णयांची अंमलबजावणी करणे सोयीचे होणार आहे. या प्रकल्पासाठी र.रु.२० कोटी १२ लाख इतका खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ आज करण्यात आला.
PCMC

AI (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वापर करून होर्डिंग सर्वेक्षण आणि नियंत्रण

शहरातील सर्व होर्डिंग्स, जाहिरात फलकांचे कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे म्हणजेच AI (artificial intelligence) तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वेक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने PPP तत्वावर कृत्रिम बुद्धिमत्ता चलित होर्डिंग डिटेक्शन आणि सर्व्हेलन्स प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. बेकायदेशीर होर्डिंग्स हटविणे, जाहिरात महसूल गळती थांबवून महसूल वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. आउटडोअर मिडीयासाठी जाहिरात अधिकारांची “रिअल-टाइम बिडिंग” लागू करणारी आणि नव्याने बाह्य मीडिया परवानगी मंजूर करताना वृक्षसंरक्षण प्रणाली विकसित करणारी पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील पहिली महापालिका ठरणार आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले.



Related Articles

- Advertisement -

Latest Articles