Monday, February 3, 2025

PCMC : जीबीएस आजारावर मनपा रुग्णालयामध्ये रुग्णांकरिता मोफत उपचार

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – शहरात Guillain – Barre Syndrome आजाराचे आजअखेर १५ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर दुषित पाण्याद्वारे आजाराचा प्रसार होण्याची शक्यता गृहीत धरून शहरातील खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या तसेच पिण्याचे पाणी जारद्वारे वितरीत करणाऱ्या पाणी नमुन्यांची तपासणी करण्याचे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले. (PCMC)

आयुक्त शेखर सिंह यांनी वैद्यकीय आणि पाणीपुरवठा विभागाची संयुक्त बैठक घेऊन आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या या आढावा या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुपेकर, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी, चीफ केमिस्ट डॉ. प्रशांत जगताप व विशेष अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते.

Guillain – Barre Syndrome या आजारामध्ये बाधित रुग्णांची प्रतिकारशक्ती मज्जातंतूवर आघात होऊन हा आजार संभावतो. या आजाराची लागण सर्व वयोगटातील व्यक्तींना होऊ शकते. अत्यल्प रूग्णांमध्ये गंभीर स्वरुपाची लक्षणे आढळून येतात. दुषित पाण्याद्वारे या आजाराची बाधा होण्याची शक्यता गृहीत धरून महापालिकेने त्या दृष्टीने उपाययोजना सुरु केल्या आहेत. महापालिकेचा पाणीपुरवठा होत असताना कोणत्याही परिस्थितीत दुषित पाण्याचा शिरकाव होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश संबधित विभागांना देण्यात आले आहेत.

या आजाराची प्राथमिक लक्षणे आढळलेले संशयित रुग्ण ज्या भागात वास्तव्य करतात त्या परिसरात महापालिकेच्या नळाद्वारे पुरविल्या जाणा-या पाण्याचे नमुने तपासण्याची मोहीम तीव्र करण्याच्या सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या. याशिवाय खाजगी विहिरी तसेच बोरवेल व टँकर मार्फत पिण्यासाठी वापरल्या जाणा-या पाण्याचे नमुनेही तपासण्यात यावेत असेही आयुक्त सिंह यांनी सांगितले आहे. अशा विहिरींची माहिती संकलित करून महापालिकेच्या पथकाद्वारे अशा ठिकाणांना भेटी देऊन त्या पाण्याचे नमुने तपासावेत. दुषित पाणी आढळून आल्यास त्याठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

PCMC

या आजारावर उपचारासाठी आवश्यक असणारे औषधोपचार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व इतर रुग्णालयांत उपलब्ध आहेत. तसेच या आजाराचे उपचार “एकत्रित महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” मध्ये समाविष्ट असून वायसीएम रुग्णालय आणि नवीन थेरगाव रुग्णालयामध्ये या योजनेअंतर्गत रुग्णांकरिता मोफत उपचार उपलब्ध आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात आजअखेर Guillain-Barre Syndrome आजाराचे संशयीत रुग्ण १५ आहेत. तसेच सर्व दाखल रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. या आजाराचे रुग्ण आढळून आलेल्या परिसरात सर्वेक्षण करण्याकरिता ८ रुग्णालय झोन अंतर्गत प्रत्येकी दोन असे एकूण १६ पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत आजअखेर ३ हजार ९८६ घरे तपासण्यात आली असून यामध्ये Guillain – Barre Syndrome आजाराचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. (PCMC)


आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गोफणे यांनी आवाहन केले आहे कि, Guillain – Barre Syndrome आजार हा नवीन नसुन यापूर्वीही या आजाराचे रुग्ण काही प्रमाणात आढळून आलेले आहेत.

त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. परंतु हातापायातील ताकद कमी होणे, हातापायाला मुंग्या (tingling sensations) येणे, गिळण्यास व बोलणेस त्रास होणे, धाप लागणे/श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे आढळून आल्यास त्वरित मनपाच्या नजीकच्या रुग्णालयात तज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच पिण्याचे पाणी उकळून गार करून प्यावे व उघड्यावरील व न शिजविलेले अन्न खाऊ नये.

(डॉ. लक्ष्मण गोफणे)
आरोग्य वैद्यकीय अधिकारी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी – ४११०१८

Related Articles

- Advertisement -

Latest Articles