पुणे (क्रांतीकुमार कडुलकर) – उत्तम बंडू तुपे यांचे लेखन हे मातीशी नाळ जोडणारे लेखन होते. त्यांमुळे उत्तम बंडू तुपे ह्यांचं साहित्य सर्वस्पर्शी आहे.ज्या समाजात आपला जन्म झाला. त्या समाजाची सुख-दुःखं आणि भाषा, बोलीभाषा असंख्य, अगम्य चालीरीती जपणारा समाज, या चालीरीतीच्या मुळाशी जाऊन जगण्यासाठी करावी लागणारी धडपड, अंधश्रद्धा, मानवी जीवनातील अनेक पदरी स्त्री-पुरुष संबंध, त्यातून होणारी परवड, शोषण, स्त्री- पुरुषांची अगतिकता याचं अगदी तटस्थपणे, अंतर्मनाचा वेध घेणारं चित्र त्यांच्या कथा-कादंबऱ्यातून घडते. (Pune)
कोणताही वाद इझमच्या नादाला न लागता, ते समाजातल्या विदारक वास्तवाचे दर्शन आपल्याला घडवतात व आपल्याला विचारप्रवण बनवतात. उत्तम बंडू तुपे हे जातीनं,जन्मानं जरी मातंग होते; तरी त्यांचं साहित्य हे जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्वस्पर्शी झालेलं जाणवतं”, अशा आशयाचे उदगार पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी काढले. (Pune)
ते भारतीय विचार साधनेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘उत्तम बंडू तुपे यांचे साहित्य : एक परिशीलन”, ह्या विषयावरील एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते.
ह्या चर्चासत्रासाठी मागवण्यात आलेल्या ३१ निबंधांचा संग्रह डॉ.धनंजय भिसे यांनी संपादित केला आहे, तो मातंग साहित्य परिषदेने निर्मिती केला असून व डॉ.दीपक चांदणे ह्यांच्या प्रतिमा पब्लिकेशन्स ह्या प्रकाशन संस्थेने सिद्ध केला आहे. त्याचे प्रकाशन ह्या प्रसंगी भारतीय समरसता गतिविधीचे सदस्य डॉ.रमेश पांडव ह्यांच्या आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
हे चर्चासत्र आणि हा ग्रंथप्रकाशन समारंभ हे दोन्ही ज्ञानज्योती मुक्ता साळवे बहुउद्देशीय समाजसेवी संस्था संचलित मातंग साहित्य परिषदेने आयोजित केले होते.
याप्रसंगी डॉ.रमेश पांडव म्हणाले ” उत्तम बंडू तुपे हे श्रेष्ठ साहित्यिक होते. संवेदनाशील उत्तमजींनी ग्रामीण गरीब शेतकरी, ग्रामीण वंचित घटक( अनुसूचित जाती जमाती) आणि महिला हे आपल्या लिखाणाचे केंद्रबिंदू मानले. अनुभव विश्वातून लेखणीबद्ध केलेल्या या कथा, कादंबर्या जीवंत तर वाटतातच पण कृतीप्रवण होण्याची प्रेरणा देतात. देव देश धर्म यांवर अविचल निष्ठा असली तरी समाजाच्या परंपरागत चौकट रचनेवरही त्यांनी घाव घातले. अन्यायाला वाचा फोडतांना कुणाची गय केली नाही, मागेपुढे पाहिले नाही. या प्रतिभावंताने पुरस्काराची अपेक्षा केली नाही तरी अनेक पुरस्कार मिळालेच. आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत साधा निवासही मिळाला नाही.
उशीराने शासनाने निवास दिला खरा पण उत्तम आणि त्यांच्या पत्नी थोड्याच अवधीत हे जग सोडून गेले. समाजात थोडे परिवर्तन झाले आहे, हे लक्षात घेऊन उद्योजकता विकासाकडे आपण घाई घाईने वळले पाहिजे. पुन्हा कोणत्याही श्रेष्ठ साहित्यिकाच्या वाट्याला असे दुःख दारिद्र्य येऊ नये, याची काळजी समाजाने घेतली पाहिजे.
यावेळी हेमंतजी हरहरे ,अशोक लोखंडे,मिलिंद तुपे यांनी आपली मनोगत व्यक्त केले. प्रारंभी डॉ. दीपक चांदणे ह्यांनी सर्वांचे स्वागत केले, मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि ग्रंथाचे संपादक डॉ.धनंजय भिसे ह्यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. रमेश पांडव यांनी चर्चासत्राचे बीजभाषण केले. नंतर डॉ.अविनाश सांगोलेकर, संपत जाधव आणि डॉ.संतोष रोडे ह्यांच्या अध्यक्षतेखाली तीन सत्रे संपन्न झाली.
या सत्रात प्रा. उमेश बेलोरे, प्रा. डॉ. सोनाली इंगळे, प्रा. प्रशांतकुमार डोंगरदिवे, प्रा. संतोष लोंढे, डॉ. सुनील आहिरे, सचिन अहिरे, प्रा. स्वाती कळंबे, डॉ. वंदना नढे, जयश्री पवार, प्रा.धनंजय झोंबाडे, सुनीता हजारे, योगेश्वरी पवार इत्यादी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अभ्यासकांनी आपले उत्तम बंडू तुपे यांच्यावरील निबंध साररूपात सादर केले.
शेवटी अण्णा धगाटे ह्यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राचा समारोप करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ.संतोष रोडे आणि धनंजय झोंबाडे ह्यांनी केले.
या प्रसंगी उत्तम बंडू तुपे ह्यांचे धाकटे सुपुत्र मिलिंद आणि नातू अंकित,तसेच अशोक लोखंडे, विलास लांडगे, शरद शिंदे, रवी ननावरे, आबा देशपांडे, राजू आवळे, दादाभाऊ आल्हाट, डॉ. माणिक सोनवणे, रोहित सकट, ज्योती शिंदे, मुकुंद यादमल, शंकर शेंडगे यांच्यासह अनेक अभ्यासक व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.