Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पिंपरी चिंचवड महापालिकेचा ४२ वा वर्धापनदिन दि. ११ ऑक्टोबर २०२४...

PCMC : पिंपरी चिंचवड महापालिकेचा ४२ वा वर्धापनदिन दि. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त आयुक्त शेखर सिंह यांचे सारांश स्वरूपात मनोगत

पिंपरी चिंचवड शहराला आंतरराष्ट्रीय पातळीवरचे वैभवशाली शहर बनविणार – आयुक्त शेखर सिंह यांचा मानस (PCMC)

औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहराला गौरवशाली इतिहास आणि संतांची परंपरा लाभलेली आहे. ही परंपरा अबाधित ठेवून शहराला स्वच्छ व सुंदर तसेच देशातील सर्वोत्तम राहण्यायोग्य शहर बनविण्यासाठी महापालिकेची वाटचाल गतीने सुरू असून हे शहर विकासाच्या दिशेने वेगाने झेपावत आहे. देशातील सर्वांत सुंदर आणि स्वच्छ शहर बनविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. अल्पावधीतच विकासाकडे उत्तुंग भरारी घेतलेल्या पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्याचा वेध घेत सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू ठेऊन महापालिकेच्या वतीने विविध विकासात्मक प्रकल्प साकारले जात आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत प्रशासकीय सेवा सुविधा अधिक गतिमान करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यातून नागरिकांना सहज सुलभ आणि तत्पर सुविधा उपलब्ध व्हाव्यात हा यामागचा मुख्य उद्देश आहे. (PCMC)

कष्टकरी कामगारांची नगरी असलेल्या या शहराच्या जडणघडणीत आणि यशामध्ये शहरातील विविध उद्योग समुहांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच हे शहर औद्योगिक नगरी म्हणून नावारूपाला आले असून अर्थव्यवस्थेला चालना देखील मिळाली आहे. या शहराला उत्तम शहर बनविण्यासाठी अनेकांनी आपले योगदान दिले आहे. आजही ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे. या नगरीचे शिल्पकार दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या संकल्पनेतून शहराची निर्मिती झाली.

या शहरातील प्रत्येक नागरिकाने शहराच्या उभारणीत आपला सहभाग नोंदविला आहे. शिवाय लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी, कर्मचारी, विविध शासकीय, निमशासकीय यंत्रणा, आस्थापना, स्वयंसेवी संस्था, माध्यम प्रतिनिधी, पोलीस यंत्रणा, विविध क्षेत्रातील संस्था, मंडळे, व्यक्ती, कार्यकर्ते, समाजसेवक अशा सर्व घटकांचेही यामध्ये अमूल्य योगदान आहे.

शहरामध्ये विविध क्षेत्रांत दिवसेंदिवस आमुलाग्र बदल घडत आहेत. नागरिकांना उत्तम आणि दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा अविरतपणे काम करीत आहे. महापालिकेच्या प्रत्येक उपक्रमांत असलेला सर्वांचा सहभाग ही जमेची बाजू असून त्यामुळेच शहराला विविध क्षेत्रात यश मिळून शहर देशपातळीसह आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करित आहे.

विकासाकडे वाटचाल करित असताना शहरात भौतिक सुविधांसह सांस्कृतिक, कला, क्रीडा या क्षेत्रांचाही विकास करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी महिला बचतगटांना ‘नवी दिशा’ उपक्रमांतर्गत काम दिले जात आहे. हा उपक्रम खऱ्या अर्थाने प्रेरणेची दिशा दाखविणारा उपक्रम ठरला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून बचतगटांना रोजगाराची संधी उपलब्ध होत असून या उपक्रमाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. ग्वांगझू आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड शहराला सन्मान पदकाने गौरविण्यात आले.

या स्पर्धेमध्ये ५४ देशांतील १९३ शहरांचा समावेश होता, यामध्ये पिंपरी चिंचवड शहराने नाविन्यपूर्णता, परिणामकारकता आणि शाश्वत शहरी विकासासाठी असलेली आपली वचनबद्धता दर्शवली. यातून महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेले विविध उपक्रम, योजना आणि कार्यक्रम यांच्या प्रभावी अंमलबजावणीचे आणि कार्यक्षम प्रशासनाचे यश अधोरेखित झाले.

महापालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी पालकांचा सहभाग वाढवून विविध उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरणासाठी डी.बी.टी अंतर्गत ई-रुपी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. औद्योगिक आस्थापनांना कुशल मनुष्यबळाची गरज असते. असे मनुष्यबळ सहज उपलब्ध व्हावे तसेच युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्पादनाभिमुख ट्रेड्सचे प्रशिक्षण देण्याचे काम अविरतपणे सुरु आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये इंग्रजी अध्ययन समृद्धी कार्यक्रम, मिशन शिष्यवृत्ती, शिक्षक सक्षमीकरण, सक्षम आदी उपक्रम राबविण्यात येत असून अध्यापनात विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची आवड निर्माण करण्यात येत आहे. तसेच विविध उपक्रमांद्वारे मुलांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. महापालिकेने इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक तसेच माध्यमिक शाळा सुरू करण्यावर लक्ष केंद्रित केले असून जागतिक व्यवहाराची भाषा विद्यार्थ्यांना आत्मसात व्हावी तसेच भविष्यात विद्यार्थ्यांना आधुनिक जगाशी स्पर्धा करता यावी हा यामागचा उद्देश आहे. (PCMC)

महापालिकेच्या वतीने संत साहित्य तसेच संगीत शिक्षण देण्यासाठी चिखली येथे ‘संतपीठ’ विकसित करण्यात आले आहे. यामुळे आपल्या मातीत घडलेल्या संतांची ओळख होऊन मुलांच्या मनात साहित्याप्रती आदर वृद्धीगंत होण्यास मदत होत आहे. या शहराची जडणघडण करताना पारंपरिक संस्कृती जतन करत सांस्कृतिक, क्रीडा, कला, साहित्य परंपरा अधिक वृद्धींगत होण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे.

सध्या पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्य करण्यास प्राधान्य देत आहेत. व्यावसायिक उपक्रमांमध्ये देखील विलक्षण वाढ होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून दळणवळणासाठी रस्त्यांचे जाळे वाढवित असताना शहरातील विविध भागांत आधुनिक पद्धतीने रस्त्यांचा विकास करण्यावर भर दिला जात आहे. शहरातील दळणवळण सेवेमध्ये मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळाली असून खासगी वाहनावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत मिळाली आहे. पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गिकेचे काम सुरू झाले आहे. मेट्रोचे जाळे शहरभर पसरत असल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचे विविध भाग जोडले जात आहेत. (PCMC)

नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी महापालिकेने अदययावत रुग्णालये विकसित केली आहेत. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, नवीन थेरगाव रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, जिजामाता रुग्णालय, आकुर्डी रुग्णालयांसारखी रुग्णालये उभारण्यात आली असून ती २४ तास अद्ययावत सेवा देण्यासाठी कार्यरत आहेत. याठिकाणी मल्टीस्पेशालिटी सेवा सुरू करण्यावर महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

डायलिसीससारखी यंत्रणा देखील रुग्णालयामध्ये सुरू करण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाची सोय केली असल्यामुळे रुग्णांना देखील त्याचा फायदा होत आहे. या सर्व बाबींमुळे उत्तम सेवेबद्दल शहरातील रुग्णालये राज्यात दुसऱ्या क्रमांकाची ठरली आहेत.

भटक्या तसेच पाळीव प्राण्यांसाठी उपचार व सोयी सुविधा नेहरूनगर याठिकाणी उपलब्ध असून अनेक भटक्या श्वानांवर उपचार केले जातात. नुकतेच महापालिकेच्या वतीने भटकी कुत्री, मांजरे तसेच इतर जणावरांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. यासोबतच डॉग पार्कची देखील उभारणी करण्यात आली आहे.

शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रासोबत आता चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्र देखील कार्यान्वित झाले असल्यामुळे महापालिका कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा करणे सुलभ झाले आहे. मैलाशुद्धीकरण प्रकल्पांमुळे शहरातील सांडपाण्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होऊन या पाण्याचा पुनर्वापर केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी निवासी सदनिका बांधल्या असून ही घरे सर्व नागरी सुविधांनी सुसज्ज आहेत. महानगरपालिकेने महिला बचत गटांसाठी आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळील जागेत फुड कोर्ट विकसित केले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मालमत्ता सर्वेक्षणामध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील मालमत्तांचे आता ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरु आहे. या द्वारे शहरातील प्रत्येक मालमत्तेचे अत्यंत सुक्ष्म मोजमाप करण्याचा महापालिकेचा मानस आहे. असा पथदर्शी उपक्रम राबविणारी राज्यातील ही पहिली महापालिका असून इतर शहरे देखील या महत्वाकांक्षी उपक्रमाचे अनुकरण करतील, असा विश्वास आहे.

नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब दिसावे यासाठी “अंदाजपत्रकात नागरी सहभाग” या उपक्रमाच्या माध्यमातून नवीन प्रकल्प, योजना, विविध कामे सुचविण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले असून नवीन वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये नागरिकांनी सुचविलेल्या सूचनांचा समावेश केला जाणार आहे.

हवामानाचा शहरातील विविध घटकांवर होणारा परिणाम लक्षात घेता विविध उपाययोजना आणि उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेने येत्या वार्षिक अंदाजपत्रकामध्ये हवामान अंदाजपत्रकाचा स्वतंत्रपणे समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान या विषयाला विशेष स्थान देऊन शहराचे पर्यावरणपूरक वातावरण टिकवून ठेवण्यासाठी महत्वपुर्ण पाऊल उचलणारे पिंपरी चिंचवड शहर जगातील पाचवे शहर ठरले आहे. (PCMC)

पर्यावरणाचा समतोल राखला जात असून जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी तळवडे येथे बायोडायव्हर्सिटी पार्क उभारले जात आहे. यामुळे संशोधन, शिक्षण, मनोरंजन तसेच पर्यटन आदी बाबींना अधिक चालना मिळणार आहे. विविध प्रकारच्या अत्याधुनिक सोयीसुविधा असणारे बायोडायव्हर्सिटी पार्क पिंपरी चिंचवड शहराच्या सौंदर्यात भर घालणार आहे. शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीकाठ परिसरामध्ये सुशोभित करण्यासाठी नदीसुधार प्रकल्प राबविला जात आहे.

पर्यटन तसेच नदीसंवर्धन आणि पर्यावरणाच्या दृष्टीने हा महत्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे. तसेच शहरातील नागरिकांना आरोग्यदायी वातावरण उपलब्ध व्हावे तसेच पर्यावरणपूरक जीवनमान अधिक उंचावण्यासाठी हरीतसेतू हा उपक्रम पथदर्शी ठरणार आहे. पर्यावरणपूरक साधनांचा प्रभावी वापर करून शहरभर पसरलेल्या हरित क्षेत्रांना एकमेकांना जोडल्यास शहराची पर्यावरणीय गुणवत्ता वाढून त्याचा लाभ शहरवासियांना व्हावा यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी ई-वाहनांचा अधिक वापर करणे, ग्रीन बिल्डींगसारख्या उपक्रमांना चालना देणे, शहरातील ईव्ही ईको सिस्टीम सुधारण्यासाठी ईव्ही रेडिनेस आराखडा तयार करणे आदी शाश्वत विकासाच्या कामांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शाश्वत विकास साधण्यासाठी सस्टेनेबिलीटी सेलसुद्धा सुरू करण्यात आली आहे. या बाबी शहरासाठी महत्वपुर्ण ठरणार आहेत.

महापालिकेच्या वतीने ‘वेस्ट टू वंडर’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. तसेच कचऱ्याची वीजनिर्मिती आणि बायोगॅस निर्मिती सारख्या प्रकल्पांमुळे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास मदत मिळत आहे. (PCMC)

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत शहरातील विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्याद्वारे संवेदनशील भागांवर लक्ष ठेवणे सोपे झाले आहे. वाहतुकीचे नियमन तसेच कायदा व सुव्यवस्था आणि नागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही यंत्रणा उपयुक्त ठरणार असून या सर्व प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. (PCMC)

पिंपरी चिंचवड शहराला क्रीडानगरी म्हणून नावलौकिक मिळवून देण्याच्या दृष्टीने तसेच शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. शहराला क्रीडाभूमी म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने शहरात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. शहरामध्ये हॉकी खेळाचा प्रचार, प्रसार आणि विकास करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने नेहरूनगर येथे मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयम या ठिकाणी आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. थेरगाव येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीच्या माध्यमातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होत आहेत.

तसेच शहरातील कुस्तीगीरांना प्रशिक्षण देण्यासाठी भोसरी येथे पै. मारुतराव लांडगे आंतरराष्ट्रीय निवासी कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर याठिकाणी आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षण केंद्रही उभारण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्रांमुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळत आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या “पीसीएमसी स्मार्ट सारथी” या प्रकल्पाला केंद्र शासनाचा ‘ई-गव्हर्नन्स स्कीम २०२३-२४’ अंतर्गत डिस्ट्रीक्ट लेव्हल इनिशिएटीव्ह्ज इन ई-गव्हर्नन्स’ या श्रेणीमध्ये सिल्व्हर पुरस्कार मिळाला. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियानात गुणानुक्रमानुसार सर्वोत्तम ठरलेल्या १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राज्यस्तरीय अमृत गटात पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने प्रथम क्रमांक मिळविला आहे. (PCMC)

सध्या शहरामध्ये काही भागात निर्माण झालेली वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने पोलिसांसमवेत समन्वय करून आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. निश्चितपणे या समस्येवर तोडगा काढून शहरातील दळणवळण व्यवस्था सुकर होईल अशी अपेक्षा आहे.

हा वर्धापन दिन भविष्यातील आव्हांनावर मात करत त्यातून मार्ग काढून सर्वसामान्य नागरिकाच्या हितासाठी संकल्प करून उद्दिष्टपुर्ती सफल करण्यासाठी निश्चय करण्याचा महत्वपुर्ण दिवस आहे. शहरवासियांच्या साथीने येत्या काळात देखील राज्यासह देशाच्या जडणघडणीमध्ये आणि सर्वांगीण विकासामध्ये आपल्या शहराचे भरीव योगदान असेल असा मला विश्वास आहे. (PCMC)

‘कटिबद्धा जनहिताय’ हे ब्रीदवाक्य असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रशासन आणि सुशासनाच्या दृष्टीने शहरवासियांना सहज आणि सुलभ पद्धतीने दर्जेदार सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकसहभागातून या वैभवशाली शहराला आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वव्यापी स्मार्ट शहर बनवण्याचा घेतलेला ध्यास निष्ठेने पुढे नेण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था तसेच शहरवासियांचे सहकार्य आणि योगदान निश्चितपणे मिळत असून ते यापुढेही कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. महापालिकेच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरवासियांना मन:पुर्वक शुभेच्छा देतो.

जय हिंद ! जय महाराष्ट्र ! जय भारत !






संबंधित लेख

लोकप्रिय