Sunday, November 24, 2024
Homeताज्या बातम्याPCMC : झिका, डेंग्यू व मलेरिया विषयी जनजागृती सत्र संपन्न

PCMC : झिका, डेंग्यू व मलेरिया विषयी जनजागृती सत्र संपन्न

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएसचा संयुक्त उपक्रम (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर
: महाराष्ट्रात झिका विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड परिसरातही झिकाचा प्रादुर्भाव झाल्याच्या घटना समोर येत आहेत. (PCMC)

त्यातच डेंग्यू व मलेरियाचाही प्रादुर्भाव पावसाळ्यात वाढण्याची शक्यता असते.या पार्श्वभूमीवर जनसामान्यांना या विषाणूजन्य आजारांबाबतची लक्षणे आणि घ्यायवयाची काळजी याबाबतची सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे या हेतूने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मंगळवारी चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या यशस्वी भवन या शैक्षणिक संकुलात विशेष जनजागृती सत्र आयोजित केले होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी राजू साबळे यांनी यावेळी झिका विषाणू, डेंग्यू व मलेरिया या आजारांचा प्रादुर्भाव कसा होतो, तसेच विषाणूबाधीत डासाने चावा घेतल्यानंतर ताप येऊन या रोगांची लागण होते. विशेष म्हणजे लहान मुले व वृद्ध व्यक्ती यांना या विषाणूजन्य आजारापासून दूर ठेवण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असे सांगत, या डासांची उत्‍पत्‍ती घरातील भांडी, टाक्‍या व टाकाऊ वस्‍तू यामध्ये साठविलेल्‍या स्‍वच्‍छ पाण्‍यात होते असेही त्यांनी सांगितले.

सर्वांनी याबाबत नेमकी काय व कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आजाराची लागण झाल्यास घाबरून न जाता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही त्यांनी सांगितले.

या जनजागृती सत्राचे प्रास्ताविक यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पवन शर्मा यांनी केले.

यावेळी संस्थेचे सर्व प्राध्यापक वर्ग, एमबीए व एमसीए विद्याशाखेचे विद्यार्थी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय