पिंपरी चिंचवड : पुणे, पिंपरी चिंचवड शहरात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून तापमान वाढत आहे. ४२ सेल्शियस पर्यंत मार्चच्या शेवटच्या आठवड्यात वाढले होते. तथापि एप्रिल व मे महिना अजुन बाकी आहे. सर्वसाधारण उन्हाळ्या मध्ये 35 ते 37 सेल्शियस च्या दरम्यानचे तापमान अल्हाददायक असते. वैश्विक तापमान वाढीला 2015 पासून सुरवात झाली आहे. देशातील अन्य शहरांमध्ये देखिल शहरामध्ये तापमान वाढीचा आलेख वाढत आहे.
शहरातील श्रमिक, मजूर, घरेलू कामगार, पथविक्रेते, फळे, फुले, भाजी विक्रेते, स्वछता कामगार, वर्कशॉप, भंगार, कागद पुठ्ठा, हमाल, हातगाडी वाले इ मोठा श्रमिक वर्ग उन्हातानात काम करत असतो. उन्हाळी थकवा तथा उष्माघातामुळे यामुळे बऱ्याच नागरिकांना चक्कर, भोवळ येते. नाकातोंडातून उष्ण हवा फुफ्फुसात जाते. कानावर उष्ण हवेचा परिणाम होतो. घाम येतो, शरीराची तापमान नियंत्रण करणारी प्रणाली कोसळते, त्वचा कोरडी पडते, डिहायड्रेशन होते. असे डॉ.किशोर खिल्लारे शहरी आरोग्य अभ्यासक यांनी आकुर्डी येथे सांगितले.
आरोग्य सल्ला : रणरणत्या उन्हात अशी घ्या त्वचेची काळजी !
योग्य काळजी घेतली नाही तर अशक्तपणा व चक्कर येऊन माणसं रस्त्यात कोसळतात. कडक उन्हामुळे शरीरातील पाणी व क्षार कमी झाल्याने स्नायूंना पेटके किंवा वेदनादायी गोळे येतात. डिहायड्रेशन झाल्यामुळे रक्तदाब कमी होतो, यालाच उष्माघात म्हणजेच हीट स्ट्रोक किंवा सनस्ट्रोक असे म्हणतात. ही जीवघेणी अवस्था आहे. यात प्रखर तापमानाला सामोरे गेल्याने शरिरातील उष्णता संतूलन संस्था नाकाम होते. वेळेवर वैद्यकीय सेवा न दिल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. नागरिकांनी ह्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
ते म्हणाले की, काही गरज नसताना मुले, महिला, वृद्ध यांनी बाहेर पडू नये किंवा नाकातोंडाभोवती शुभ्र कापड गुंडाळावे, छत्री डोक्यावर घ्यावी, डोळ्यावर गॉगल लावावा. अतिशय जड आहार करू नये, कॅफेनयुक्त चहा व काॅफी व अल्कोहोलचे सेवन करू नये.
आरोग्यवार्ता : कडक उन्हाळ्यात कसे टाळावे आजार, वाचा !
लिंबू सरबत, फळे, कोकम, ऊस, ताक, इत्यादी आहारात असावे. थंडगार पाणी भरपूर प्रमाणात प्यावे. घट्ट व गडद रंगाचे कापडे परिधान करू नये. उन्हाळी थकवा हा देखील सौम्य ते मध्यम प्रतीचा आजार आहे. ह्यामध्ये देखिल चक्कर येणे, भोवळ येणे, डोकेदुखी, मळमळ, उलट्या होतात, खुप घाम येतो व कधीतर अतिसारपण होतो व अशक्तपणा येतो ह्याचा परिणाम दोन आठवड्यापर्यंत राहु शकतो. तर उष्माघात हा अत्यंत गंभीर आजार असुन त्वरित ईमर्जंसी कक्षात उपचार करण्यात येतात.
बर्फासारख्या थंड पाण्याने अंग वारंवार पुसतात. बेशुद्ध अवस्था ते रूग्ण कोमात देखील जाऊ शकतो. डिहायड्रेशन होऊन रक्तदाब कमी असेल तर शिरेवाटे सलाईन लावतात व मेंदू, ह्रदय व किडनीवर परिणाम होत असेल तर अतिदक्षता विभागात उपचार केले जातात.
उन्हाळी थकव्याचा परिणाम दोन दिवस ते दोन आठवड्यांपर्यंत राहतो तर उष्माघाताचा परिणाम दोन आठवडे ते वर्षभर राहु शकतो. तेव्हा उन्हाळ्यात सर्वांनी काळजी घ्यावी.
डॉ. किशोर खिल्लारे
शहरी आरोग्य अभ्यासक
शब्दांकन – क्रांतिकुमार कडुलकर