Thursday, April 25, 2024
Homeराजकारणशंखी गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ९८ कोटी रुपयांची मदत

शंखी गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ९८ कोटी रुपयांची मदत

मुंबई, दि. १४ : राज्यात लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याबाबत मदत देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते त्यानुसार शंखी गोगलगायीमुळे शेती पिकांच्या नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना ९८ कोटी ५८ लाख रूपये निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी पेक्षा वाढीव दराने मदत वितरित करण्यात येणार आहे.

या आपत्तीमुळे १ लाख १८ हजार ९९६ इतके शेतकरी बाधित झाले आहेत. या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी ९८ कोटी ५८ लाख रुपयांची मंजूर मदत तातडीने वितरित करण्याचे आदेश नुकतेच मदत व पुनर्वसन विभागाकडून काढण्यात आले आहेत.

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांच्या मदतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार जिरायत शेतीसाठी पूर्वीचा दर प्रति हेक्टरी ६८०० वरून वाढवून प्रति हेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायत शेतीसाठी प्रति हेक्टरी १३ हजार ५०० रूपयांवरुन २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक शेतीसाठी पूर्वीचा दर १८ हजार रूपयांवरून ३६ हजार रुपये करण्यात आला आहे. जिरायत, बागायत व बहुवार्षिक पिकांच्या बाबतीत यापूर्वी दोन हेक्टरच्या मदतीत वाढ करून प्रति तीन हेक्टर अशी वाढ करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठीचा मदतीचा निधी संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने १४ सप्टेंबर २०२२ रोजी निर्गमित केला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय