Kalyan Building Slab Collapses : कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा, मंगलराघो नगर येथील सप्तशृंगी नावाच्या चार मजली सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीचा स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर फ्लोअरिंगचे काम (लादी बसवण्याचे काम) सुरू होते. याच दरम्यान स्लॅब अचानक कोसळला आणि तो थेट तळमजल्यापर्यंत खाली आला.
कल्याण शहरातील कल्याण (पूर्व) चिकणीपाडा येथील सप्तशृंगी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या पाच मजली निवासी इमारतीमधील चौथ्या मजल्यावर फरशी बसविण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना चौथ्या मजल्याचा स्लॅब खाली कोसळला आणि दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकूण 6 व्यक्ती जखमी झाल्या असून, 6 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती तहसिलदार सचिन शेजाळ यांनी दिली आहे. (हेही वाचा : ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन)
Kalyan Building Slab Collapses | दुर्घटनेतील मृतांची नावे
या दुर्घटनेतील मृतांची नावे प्रमिला साहू (वय 58), नामस्वी शेलार (वय 1.5 वर्षे), सुनीता साहू (वय 37), सुजाता पाडी (वय 32), सुशीला गुजर (वय 78), व्यंकट चव्हाण (वय 42) असून जखमी झालेल्यांमध्ये अरुणा रोहिदास गिरणारायन (वय 48), शरवील श्रीकांत शेलार (वय 4), विनायक मनोज पाधी (वय 45), यश क्षीरसागर (वय 13), निखिल खरात (वय 27), आणि श्रद्धा साहू (वय 14) यांचा समावेश आहे. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. (हेही वाचा : ब्रेकिंग : लाडक्या बहिणींना 40 हजारांपर्यंत कर्ज मिळणार ; अजित पवार यांची मोठी घोषणा)
घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC), अग्निशमन दल, आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले, आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 8 जणांना बाहेर काढण्यात यश आले, त्यापैकी 6 जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. बचाव कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते, आणि ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का याचा शोध घेण्यात आला.
मात्र, हवामान खात्याने दिलेल्या पावसाच्या इशाऱ्यामुळे बचाव कार्यात अडथळे येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. (हेही वाचा : छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, वाचा कोणते खाते मिळणार ?)
सप्तशृंगी इमारत सुमारे 40 वर्षे जुनी असून, ती धोकादायक अवस्थेत होती. स्थानिक रहिवाशांच्या मते, इमारतीची नियमित देखभाल आणि दुरुस्ती वेळीच झाली नाही, ज्यामुळे ही दुर्घटना घडली. या इमारतीत सुमारे 50 कुटुंबे राहत होती, आणि ती सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अंतर्गत येते. यापूर्वीही कल्याण आणि परिसरात अशा जुन्या इमारतींच्या देखभालीच्या अभावामुळे अशा दुर्घटना घडल्या आहेत, ज्यामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (हेही वाचा : खळबळजनक : शाळेत तब्बल 20 फुटांचा किंग कोब्रा आढळला)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, बचाव कार्यात गती आणण्याचे आणि मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. (हेही वाचा : प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण)