भूवनेश्वर : भारतीय हवामान विभागानं गुरुवारी (2 डिसेंबर) जवाद चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशाच्या ४ जिल्ह्यांत रेड अलर्ट घोषित केला आहे. ७ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तिसरे चक्रीवादळ आंध्र आणि ओडिशा किनारपट्टीवर ‘जवाद’ चक्रीवादळ उद्या धडकणार, अशी शक्यता आहे.
मान्सून परतल्यानंतर देशातील पहिले व यंदाचे तिसरे चक्रीवादळ वादळ सरकारच्या नाकी नऊ आणण्याची शक्यता आहे
पूर्वेकडील किनारपट्टीवरील राज्यांवर आता ‘जवाद’ चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. हवामान विभागानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. ते आंध्र प्रदेशचा उत्तर भाग आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर ४ डिसेंबरला सकाळी धडकेल, अशी शक्यता असून तेव्हा चक्रीवादळाची गती १०० किमी प्रति तास राहू शकते. त्यामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
मे महिन्यातील ‘यास’ आणि सप्टेंबरमधील ‘गुलाब’नंतर हे या वर्षातील तिसरे चक्रीवादळ असून ते पूर्वेच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्ये आणि केंद्रीय मंत्रालयांच्या तयारीचा आढावा घेतला.
एन डी आर एफ ची ३३ पथके सरकारने तैनात केली आहेत. ५ ते ५ डिसेंबरदरम्यान समुद्रात न जाण्याचा सल्ला मच्छिमारांना देण्यात आल्याचं हवामान विभागाच्या उमाशंकर दास यांनी म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी ते बोलत होते.