Friday, March 29, 2024
HomeNewsआदिवासी आश्रमशाळेतील १२० मुला-मुलींना एकाच ट्रकमध्ये कोंबून प्रवास ; १० मुलांची प्रकृती...

आदिवासी आश्रमशाळेतील १२० मुला-मुलींना एकाच ट्रकमध्ये कोंबून प्रवास ; १० मुलांची प्रकृती बिघडली !

गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आदिवासी आश्रमशाळेतील १२० मुला-मुलींना एकाच ट्रकमध्ये कोंबून प्रवास करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

शाळा प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे अस्वस्थ झालेल्या १० मुलांची प्रकृती बिघडली आहे. गाडीत श्वास घ्यायला जागा मिळत नसल्याने अक्षरश: काही मुले बेशुद्ध पडली. अखेर गाडीत मोठा गोंधळ उडाल्यानंतर गाडी थेट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेला वळवण्यात आली. देवरीचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राचलवार यांनी मुलांवर उपचार सुरू आहेत. वाहनातील गर्दीमुळे गुदमरल्याने त्यांची प्रकृती खालावल्याचे सांगितले.

ट्रकमध्ये ज्या १२० मुला-मुलींना अक्षरश: कोंबले होते. ते गोंदिया तालुका अंतर्गत येत असलेल्या मजितपूर येथील शासकीय आदिवासी शाळेतील विद्यार्थी आहेत. या सर्वांना कोयलारी या आश्रम शाळेत खेळण्यासाठी नेले होते. तिथून शनिवारी (दि. २४) रात्री परत येत असताना संबंधित प्रकार घडला. परत असताना काही विद्यार्थी बेशुद्ध पडले आणि गाडीत गोंधळ उडाला. अखेर गाडी थांबवण्यात आली. तिथे असलेल्यांना समजत नव्हते. त्यामुळे तातडीने सर्व मुलांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर तीन मुलींना उपचारासाठी गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

संबंधित घटनेमुळे गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. खरंतर शाळा प्रशासनाने या गोष्टींचा विचार करायला हवा होता, अशी चर्चा परिसरात सुरु आहे. एकाच गाडीत तब्बल १२० विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना कोंबणे, हे खरंच अतिशय धक्कादायक आहे. त्यामुळे संबंधितांवर प्रशासन कारवाई करणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय