Tuesday, January 21, 2025

शिवभोजन थाळी आणि अन्नधान्य वितरणा बाबतीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबई : राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांच्याकाळात गोरगरिबांसाठी शिवभोजन थाळी महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. राज्यातल्या सर्व शिवभोजन केंद्रांना आपण दिडपट जास्त थाळ्या वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या सर्व गरजू आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपणा सर्वांची असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी आणि अन्नधान्य वितरणासंदर्भात विभागाचे अधिकारी व राज्याच्या सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासमवेत आज मंत्रालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली.

मोफत शिवभोजन थाळी देत असताना ती नागरिकांना राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांनुसार पार्सल स्वरुपात मिळणार आहे. त्यामुळे शिवभोजन केंद्रावर पार्सल स्वरूपात मिळणारे अन्न हे निकृष्ट स्वरूपाचे तर नाही ना याची खातरजमा देखील अधिकाऱ्यांनी करायला हवी त्याचप्रमाणे यामध्ये कोरोनाचे नियम व स्वच्छता ठेवली जात आहे का आणि अनियमितता किंवा गैरप्रकार होत नाही ना यावर देखील सर्व अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, असे निर्देश भुजबळ यांनी आज दिले.

यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात अतिशय जबाबदारीने सर्वांना वागावे लागणार आहे. राज्यात निर्बंधांच्या काळात ज्या विभागांवर महत्त्वाची जबाबदारी असते त्यापैकी एक अन्न धान्य वितरण विभाग आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला वेळेत आणि नियोजनबद्ध असा अन्नधान्याचा पुरवठा झालाच पाहिजे. महाराष्ट्र सरकारने मोफत अन्नधान्य वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार राज्यातल्या 7 कोटी लोकांना धान्य मोफत देणार आहोत. ज्या लाभार्थ्यांनी योजना चालू होण्याचा अगोदर धान्य घेतले आहे त्यांना पुढील महिन्यात लाभ मिळायला हवा. कोणत्याही परिस्थितीत खराब अन्नधान्य वितरीत होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी असे भुजबळ यांनी सांगितले. ज्या ठिकाणावरून तक्रारी येतील त्या सर्व तक्रारींची देखील शहानिशा करण्यात आली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

राज्यातील अनेक रेशनिंग दुकानदारांनी ऑनलाईन पद्धतीला विरोध केला आहे, अंगठा दुकानात येऊन प्रत्येक व्यक्ती लावते त्यामुळे कोविड संक्रमण होत असल्याची राशन दुकानदारांची चिंता आहे. मात्र केंद्र सरकारच्या नियमानुसार ही यंत्रणा चालू राहणार आहे. मागच्या लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारने ही प्रणाली बंद केली होती पण यावर केंद्र सरकारने प्रश्न उपस्थित केले होते त्यामुळे केंद्राची परवानगी असेल तरच ही पद्धत बंद करता येईल, असे भुजबळ यांनी सांगितले.

राज्यात या संकटाच्या काळात कुठेही अन्नधान्यांची आणि वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री होणार नाही याची काळजी घ्यावी, असे कुठे निदर्शनास आले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे निर्देश देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेला धानभरडाईचा प्रश्न छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांने मार्गी लागला आहे. त्याचा आढावा त्‍यांनी घेतला विदर्भातील पाच जिल्ह्यांतील मिलींग पूर्ण क्षमतेने चालू झाली आहे का याची माहिती भुजबळ यांनी घेतली.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles